Ticker

4/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

देवाने दिलेली महान संधी

 

Great opportunity given by God - King Nebuchadnezzar
राजा नबुखदनेस्सर
प्रियांनो आपण मागील प्रकरणात नबुखदनेस्सर राजाच्या परिवर्तनाविषयी पाहिले. एका कठीण हृदयाच्या व्यक्तीला देवाने नम्र केले. जगामध्ये सर्वात मोठा चमत्कार म्हणजे त्या व्यक्तीचे ह्रदय बदलणे होय. त्यांचे परिवर्तन होणे होय. देवाची इच्छा आहे की सर्वांचे परिवर्तन व्हावे. यहोवाने नबुखदनेस्सर राजाला बदलले. तुमचे व माझे काय ? काय आम्ही बदललो आहोत काय ? नबुखदनेस्सर राजाला आपल्या राजपदाचा, सत्तेचा, सामर्थ्याचा, साम्राज्याचा, संपत्तीचा मोठा गर्व होता. आम्हालाही आज आमच्या नोकरी पदाचा, घराचा, धनसंपत्तीचा मोठा गर्व असतो. नबुखदनेस्सर राजासारखे आम्ही देखील जीवन जगत आहोत का ? याचा आम्ही विचार केला पाहिजे. देवबाप रोज आम्हाला त्याच्या कडे वळण्याची संधी देत आहे. प्रभू येशूच्या द्वारे देण्यात आलेला तारण आम्ही स्वीकारावे यासाठी त्याच्या पवित्र आत्मा द्वारे तो आम्हास विनवत आहे. देवाला कोणाच्याही नाशामध्ये संतोष नाही.


   

the crossing of the red sea - moses - Great opportunity given by God
तांबडा समुद्र

एक जुनी अख्यायिका आहे. ज्यावेळेस इस्राएल लोक तांबडा समुद्र पार करत होते. मिसरी सैन्याने त्यांचा पाठलाग केला. परमेश्वराने इस्राएल लोकांना सुखरूप समुद्रातून बाहेर काढले आणि सर्व मिसरी सैन्याचा नाश केला. सर्व मिसरी सैन्य समुद्राच्या पाण्यात गडप झाले. तेव्हा स्वर्गात देवदूतांनी मोठा आनंद व्यक्त केला सर्व देवदूत देवाच्या महान पराक्रमाची स्तुती करत देवाचा महिमा करीत होते. परंतु या सर्व आनंदाच्या वातावरणात देवाच्या चेहऱ्यावर दुःख होते. देवदूतांनी परमेश्वराला विचारले की, तो दुःखी का आहे ? त्याने केलेल्या अद्भुत कार्याबद्दल त्याला आनंद का झालेला नाही ? देवाने उत्तर दिले तुम्ही आनंद का करता मिसरी लोकांनाही मीच निर्माण केले आहे. पण त्यांनी माझे ऐकले नाही माझ्या विरुद्ध त्यांनी बंड केले म्हणून आज त्यांचा नाश झाला. त्याच्या नाशाने मला दुःख झाले आहे. कोणाचा नाश व्हावा यात मला आनंद नाही.


परमेश्वर म्हणतो माझ्या जीविताची शपथ कोणी दुर्जन मरावा यात मला संतोष नाही. तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे यात मला संतोष आहे. फिरा आपल्या मार्गावरून मागे फिरा इस्राएल वंशजहो तुम्ही का मरता. ( यहज्के- ३३:११ पहा )  


प्रभू येशूने ह्या जगात तीन वर्ष सेवाकार्य केले त्याच्या सेवेचा एकच उद्देश होता की ह्या जगाचे तारण करावे होय. त्याने म्हटले अहो कष्टी व भाराक्रांत जनहो तुम्ही मजकडे या म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. ( मत्त- ११:२८ ) यहुदी लोकांना देवाकडे वळण्यासाठी प्रभूने फार विनवण्या केल्या. पण यहुद्यांनी त्याचा धिक्कार केला. त्यांनी येशूला स्वीकारले नाही. तर प्रभू येशूला धरून देऊन वधस्तंभावर खिळले. आपल्या अखेरच्या दिवसात त्याने यरुशलमे कडे पाहून दुःखोद्गार काढले यरुशलेमे, यरुशलेमे संदेष्ट्याचा घात करणारे व तुझाकडे पाठविलेल्यास धोंडमार करणारे जशी कोंबडी आपली पिल्ले एकवटते तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटावयाची कितीदा तरी माझी इच्छा होती. पण तुमची इच्छा नव्हती ! ( मत्त- २३:३७ ) 


इस्राएली लोक मिसर देशातून निघाल्या पासून देवाविरुधात सतत बंडच करत राहिली. देवाचा धिक्कार करत राहिली. देवाकडे वळण्याची संधी पुन्हा पुन्हा संधी दिली गेली. पण त्यांनी त्या संधीचा अव्हेर केला व त्याचा परिणाम या राष्ट्राच्या नाशात झाला. इस्राएली लोकांच्या इतिहासातून आम्ही फार मोठा धडा शिकतो. देवाच्या विरोधात वागण्यामुळे त्यांना त्याचा मोठा परिणाम भोगावा लागला. आज शेवटल्या काळात आम्ही जगत असताना देव त्याची कृपा आम्हावर करत आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे लोकांना तो बदलत आहे. आज आम्ही देखील पश्चाताप करून देवाकडे वळावे. नबुखदनेस्सर राजाने आपला गर्व व अभिमान सोडला. तसे आपण पाप सोडून परमेश्वराकडे वळावे. बाबेलच्या सम्राटाचा इतिहास आपल्यापुढे आहे देवाने राजाला शिक्षा दिली. त्या शिक्षेद्वारे त्याच्या जीवनाला वळण लागले तो लीन झाला. आज तुम्ही नबुखदनेस्सर राजासारख्या शिक्षेची व देवाच्या कोपाची तुम्ही वाट पाहत आहात का ? देव आमचे धीराने सहन करतो. त्याच्या कृपेचा आपण अनादर करतो का ? तो ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईल. हे वचन सत्य आहे.


दानिएलाचा देव आजही जिवंत आहे व तो जीवनाचे परिवर्तन करणारा देव आहे. नबुखदनेस्सर राजाला जर देव बदलू शकतो तर तो तुम्हाला व मला बदलण्यास पूर्णपणे समर्थ आहे. देवाकडे मानवाचे तारण करणे ह्यापेक्षा त्याजकडे दुसरे कोणतेही मोठे कार्य नाही. आम्ही नबुखदनेस्सर जीवनाकडे पाहू त्यापासून धडा घेऊ तो विधर्मी राजा जो देवाला पूर्वी ओळखत नव्हता तो परमेश्वराचा चांगला सेवक झाला.


पवित्र आत्मा आज आपल्याशी बोलत आहे. ह्यावरून पवित्र आत्मा म्हणतो त्याप्रमाणे आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्राएल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. ( इब्री- ३:७,८ )


Great opportunity given by God

देवाला शरण या व आपले जीवन देवाला समर्पण करा प्रभू येशूने वधस्तंभावर केलेले बलिदान जे तुमच्यासाठी होते त्याला व्यर्थ होऊ देऊ नका. आदामाने पाप केले त्याचा परिणाम संपूर्ण मानवजातीला भोगावा लागला. त्या एका पापाचा परिणाम मानव आजही भोगत आहे. पापामुळेच मानव देवाच्या गौरवाला उणे पडला आहे. देव मनुष्याला पुन्हा त्याचे स्थान देऊ इच्छित आहे. जे स्थान सैतानाने आदामाला फसवून घेतले आहे.


पण सैतान पराभूत झाला आहे. ख्रिस्ताने वधस्तंभावर त्याचा पराभव केला आहे. सैतानाचा एकच उद्देश आहे. देवाचे कार्य नष्ट करणे मनुष्याचा नाश करणे होय. आज आपण ह्या गोष्टी समजून घ्याव्यात स्वतःचा नाश होऊ नये यासाठी देवाचा आश्रय करावा.


आजच प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकार करा ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. १योहा- :१२ )

 

                                                                                                                          लेखक : पा. अमित पारधे